anekant.news@gmail.com

9960806673

साखर आयुक्त डॉ. खेमनार यांची अचानक बदली

राज्याचा ऊस गाळप हंगाम अद्याप सुरू असतानाच साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची राज्य सरकारने अचानक बदली केली आहे. विशेष म्हणजे नवे आयुक्त देण्यात आले नसल्यामुळे साखर उद्योगातून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

डॉ. खेमनार यांची बदली मुंबईमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्यालयात झाली. तेथे ते सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम सांभाळणार आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी तसा आदेश मंगळवारी (ता.११) जारी केला. डॉ. खेमनार यांना आयुक्तपदी एक वर्षदेखील पूर्ण झालेले नव्हते.

मुळात, त्यांना नागरी प्रशासकीय सेवांमध्ये जास्त अनुभव असताना त्यांना थेट सहकार, ग्रामीण व कृषी संबंधी कामकाज असलेल्या साखर आयुक्तपदावर अचानक नियुक्त केले गेले होते. त्यामुळे त्यांचे पहिले काही महिने साखर उद्योग समजावून घेण्यात गेले होते.

साखर आयुक्तपद सनदी अधिकारी (आयएएस) श्रेणीतून भरले जाते. आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करताना त्यांच्या जागेवर राज्य सरकारने नवा पूर्णवेळ आयुक्त नियुक्त केलेला नाही. त्यामुळे ऐन गाळप हंगामात प्रभारी साखर आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली साखर आयुक्तालयाचे कामकाज चालवावे लागणार आहे.

साखर आयुक्तालयात सध्या केवळ अर्थ विभागाचे संचालक यशवंत गिरी हेच अनुभवी अधिकारी आहेत. राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या सल्ल्याने डॉ. खेमनार यांनी इतर अधिकाऱ्याकडे साखर आयुक्तपदाचा पदभार द्यावा व तत्काळ मुंबईत औद्योगिक महामंडळामध्ये बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. सूत्रांनुसार, राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे साखर आयुक्त पदाची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.