anekant.news@gmail.com

9960806673

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला कोणी वालीच नाही, अधिकारी टाळे ठोकून झाले गायब

कोल्हापूर : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दालन सहा दिवसांपासून बंद आहे. सहसंचालकांचे दालन स्वत:च बंद करून ते ३१ जुलैनंतर अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत, अशी धक्कादायक चित्र पाहायला मिळाले आहे. आंदोलन अंकुशचे पदाधिकारी गत हंगामातील ठरलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गेले होते.

यावेळी हा धक्कादायक प्रकार दिसला.साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ठरलेला दुसरा हप्ता द्यावा, यासाठी आंदोलन अंकुशकडून १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलन अकुंशच्या पदाधिकाऱ्यांना साखर सहसंचालक कार्यालयालयाला टाळे ठोकून बंद असल्याचे दिसले. त्यांनी त्या टाळ्यावर ३१ जुलैपासून हे बंद असल्याचे दिसले.

दरम्यान, गत हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या दरम्यान पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी अशा दोन बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीनंतर झालेल्या तोडग्यात जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता देण्यास तयार असल्याची संमतीपत्रे दिली होती व त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

त्या शेवटच्या बैठकीत पालकमंत्र्यांची याला संमती घेऊन तसे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्हा पोलिसप्रमुखही बैठकीला उपस्थित होते. मात्र, अद्यापही हा हप्ता दिलेला नाही. यावेळी, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.