जिल्ह्यात यांत्रिकीकरणामुळे शेतकर्यांची मजुराऐवजी यंत्रांना प्राधान्य
सांगली ः जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. गेल्या काही वर्षांपासून मजुरांऐवजी यंत्रांद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात आहे. मजूर टंचाईमुळे यंत्राद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात आहे. मजूर टंचाईमुळे कारखानदारांनी हा बदल स्वीकारला आहे. जिल्ह्यात मोठ्या कारखान्यांकडे प्रत्येकी 25-30 यंत्रे, तर छोट्या कारखान्यांकडे 10-15 यंत्रे ऊसतोडणीचे काम वेगाने करीत आहेत. शेतकरीही मजुरांऐवजी यंत्राच्या तोडणीला प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात 300 हून अधिक यंत्रांद्वारे ऊसतोडणी होत आहे.
जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांकडे ऊसतोडणीसाठी 50 हजारांहून अधिक मजूर दाखल झालेले आहेत. ऊसतोडणीसाठी येणार्या भागातही सिंचनाच्या सोयी, नगदी, फळपिकांची वाढलेली शेती या कारणांमुळे मजुरांना स्थानिक पातळीवर मजुरी उपलब्ध झाली आहे. त्यांची मुले शिकून विविध पदांवर काम करीत आहेत. तसेच काही नोकरीसाठी मोठ्या शहरात जात असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात 1 लाख 37 हजार 103 हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्याची सरासरी हेक्टरी उत्पादकता 83 टन आहे. मात्र यंदा सातत्याने पाऊस झाला असल्याने शेतकर्यांना खते टाकता आली नाहीत. जमिनी घट्ट राहिल्या. जमिनीत वाफसा आला नसल्याने जी काही खते होती ते अन्न म्हणून उसाला घेता आली नाही. परिणामी यंदा एकरी 10 टनाने उतारा कमी मिळत असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून मजुरांची संख्या घटल्याने कारखानदार आणि शेतकर्यांचा ऊस तातडीने तोडण्यासाठी यंत्रे महत्त्वाची ठरताहेत. गत वर्षी यंत्रासाठी अनुदान मिळाल्यामुळे राज्यभरात यंत्रांची संख्या वाढलेली आहे. यामुळे नवीन बेरोजगारांसाठी गुंतवणूक जास्त असली तरीही एक व्यवसाय मिळाला आहे. प्रत्येक कारखान्याकडे किमान 15 ते 20 यंत्रे आहेत. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. - मृत्युंजय शिंदे, उपाध्यक्ष, श्री दत्त इंडिया (वसंतदादा) सांगली (सकाळ, 15.12.2024)