शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
पुणे ः देशात साखरेचे प्रतिक्विंटल दर कमी होऊन 3300 ते 3350 रूपयांपर्यंत घसरल्याने साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. तर यंदाचा हंगाम 2024-25 साठी एफआरपीचा दर प्रतिटनास 3400 रूपये आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाजाला दिलासा देण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल 4051 रूपये करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
देय एफआरपीच्या दरापेक्षा साखरेचे दर खाली आल्याने एमएसपीत वाढ करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी इथेनॉलच्या खरेदीदरातही वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या शिष्टमंडळाने 6 डिसेंबर रोजी पवार यांची भेट घेऊन साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून पवार यांनी केंद्र सरकारला निवेदन देऊन या मागण्या केल्या आहेत.
उसाचा रस-सिरप, बी हेवी मळी आणि सी हेवी मळीपासून मिळणार्या इथेनॉलच्या किमतीमध्ये वाढ करण्याची मागणी यापूर्वीही केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयास करून हस्तक्षेप करण्याची मागणी 15 जून 2024 रोजीच्या पत्रााद्वारे मी केली होती, असेही पवार यांनी निवेदनात संदर्भ देऊ न केले आहे. साखरेचे दर घसरल्यामुळे सध्या साखर उद्योग रोखीच्या तोट्यामुळे गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. (पुढारी, 19.12.2024)