केंद्र सरकारची भूमिका ः गेल्या हंगामात 21.5, तर यंदा 40 लाख टन साखर वळविणार
कोल्हापूर ः गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी इथेनॉलनिर्मितीसाठ साखरेसह मोलॅसिस, उसाच्या रसाचा दुप्पट वापर करण्यात येणार आहे. गेल्या हंगामात 21 लाख 50 हजार टन साखरनिर्मितीसाठी आवश्यक मोलॅसिससह उसाचा रस इथेनॉलनिर्मितीसाठी वापरण्यात आला होता. यावर्षी हे प्रमाण 40 लाख टनांपर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.
बाजारातील साखरेची मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यावरून साखरेचे दर ठरत असतात. जादा साखर आली तर दर कोसळतात. तर कमी साखरेमुळे दर तेजीत राहतात. त्याशिवाय यावर्षीच्या हंगामात इंधनात किमान 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे. बाजारातील साखरेचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त साखरेसह अन्य उपपदार्थ इथेनॉलनिर्मितीसाठी वळवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या इंधनातील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 14 टक्के आहे.
यावर्षीचा साखर हंगाम सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी गाळप आणि हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांची संख्याही घटली आहे. 2023-24 च्या हंगामात 15 डिसेंबरपर्यंत देशात 496 साखर कारखान्यांनी 74.505 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यावर्षी 477 कारखान्यांनी केवळ 61.39 लाख टन साखरनिर्मिती केली आहे.
यावर्षी महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकातील साखर कारखाने 7-12 दिवस उशिरा सुरू झाले आहेत, तर महाराष्ट्रातही गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा हंगाम 15 दिवस उशिरा सुरू झालेला आहे. साखर उत्पादन जास्त असलेल्या या प्रमुख राज्यात हंगाम उशिरा सुरू होऊनही हंगाम घेतलेल्या कारखान्यांच्या संख्येबरोबरच त्यांनी केलेल्या गाळपाची गती जास्त आहे.
यावर्षी देशभरात 330 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी 40 लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीसाठी गेल्यास देशात विक्रीसाठी 280 लाख टन साखर शिल्लक असेल. गेल्यावर्षीच्या हंगामातील 80 लाख टन साखर शिल्लक आहे. म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये 90 लाख टन साखर शिल्लक असणार आहे. ही वस्तुस्थिती पाहता साखर उद्योगासमोरील अडचणी तातडीने सोडवणे आवश्यक आहे.
साखर उद्योगासमोरील सद्यस्थितीत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी साखरेचा हमीभाव व इथेनॉलच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे. याशिवाय यावर्षीच्या हंगामात किमान 20 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय केंद्र सरकारने घेण्याची गरज आहे. - पी.जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक (सकाळ, 18.12.2024)
देशातील हंगामाची तुलना (साखर उत्पादन लाख मे.टन)
15.12.2024 15.12.2024
राज्य कारखाने साखर उत्पादन कारखाने साखर उत्पादन
यूपी 121 23.04 117 22.11
महाराष्ट्र 183 16.78 191 24.45
कर्नाटक 76 13.85 73 17.56
गुजरात 14 1.80 16 2.72
तमिळनाडू 5 0.98 19 1.77
इतर 78 4.94 80 5.44
एकूण 477 61.39 496 74.00